Marathi Translation of the “The Golden Bird” for IML Day Drive

By Aniruddha Banhatti

All entries to our IML Day Drive are licensed under CC BY 3.0

सोनेरी पक्षी

एका राजाची बाग फार सुंदर होती. त्या बागेत एका झाडाला सोनेरी सफरचंदं लागायची. या सफरचंदांची नेहमी मोजदाद व्हायची आणि ती पिकायला लागली की रोज रात्री त्यातलं एक गायब व्हायचं. यामुळे राजा फार चिडला आणि माळ्याला त्यानं रात्रभर झाडाखाली पहारा द्यायला सांगितलं. माळ्यानं आपल्या सर्वात मोठ्या मुलाला पहारा द्यायला बसवलं पण तो मध्यरात्री झोपून गेला आणि दुसऱ्या दिवशी एक सफरचंद कमी भरलं. दुसऱ्या दिवशी त्यानं आपल्या मधल्या मुलाला पहाऱ्याला बसवलं, पण मध्यरात्री तो पण झोपून गेला आणि दुसऱ्या दिवशी आणखी एक सफरचंद कमी भरलं. मग धाकट्या मुलानं पहारा देण्याची तयारी दाखवली पण माळी सुरुवातीला त्याला काही इजा होईल म्हणून घाबरून तयार होईना, पण शेवटी त्यानं परवानगी दिली, आणि धाकटा रात्री झाडाखाली झोपून राहिला. घड्याळाचे बाराचे ठोके पडताच त्याला हवेत वर सळसळ ऐकू आली आणि एक पूर्ण सोन्याचा बनलेला पक्षी उडत उडत आला आणि तो जसा आपल्या चोचेनं एक सफरचंद तोडत होता तसा तो मुलगा उडी मारून उठला आणि त्यानं पक्षावर एक बाण सोडला. पण त्या बाणानं त्या पक्षाला काहीच इजा झाली नाही, फक्त त्याचं एक सोनेरी पीस खाली पडलं, आणि तो पक्षी उडून गेला. सकाळी ते पीस राजाकडे नेल्यावर सगळ्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली. सगळ्यांनी कबूल केलं की ते पीस पूर्ण राज्यातल्या संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान होतं: पण राजा म्हणाला, “एक पीस माझ्या काही कामाचं नाही. मला तो पूर्ण पक्षी मिळालाच पाहिजे.”

मग माळ्याचा सर्वात मोठा मुलगा तो सोन्याचा पक्षी आणायला निघाला अन त्याला वाटलं की अगदी सहज आप्ल्याला तो सापडेल; आणि तो थोडं अंतर गेल्यावर त्याला एक जंगल लागलं आणि त्या जवळ एक कोल्हा बसला होता; म्हणून त्यानं धनुष्य काढलं आणि कोल्ह्यावर बाण सोडायला सज्ज केला. तेंव्हा कोल्हा म्हणाला, “मला मारू नकोस; कारण मी तुला चांगला सल्ला देईन; मला माहित आहे तुझं काम काय आहे, आणि तू सोनेरी पक्षी शोधतो आहेस हे सुद्धा! तू संध्याकाळ पर्यंत एका खेड्यात पोहोचशील आणि तुला समोरासमोर असलेल्या दोन खानावळी दिसतील, पैकी एक जी खूप छान आणि आरामशीर दिसेल तिथे तू जाऊ नकोस, रात्री विश्रांतीसाठी दुसऱ्या खानावळीत जा; जरी ती तुला भिकार आणि घाणेरडी वाटली तरी.” पण त्या मुलानं स्वत:शी विचार केला, “या असल्या प्राण्याला अशा गोष्टींबद्दल काय कळतंय?” म्हणून त्यानं त्या कोल्ह्यावर बाण सोडला पण तो कोल्हा शेपूट उंचावून जंगलात पळून गेला. मग तो मुलगा पुढे निघाला आणि संध्याकाळी त्या दोन खानावळी असलेल्या खेड्यापाशी आला; तर एका खानावळीत लोक गात नाचत आणि मजा करत होते, पण दुसरी खानावळ अगदी दरिद्री आणि घाणेरडी दिसत होती. “त्या घाणेरड्या खानावळीत जायला मी काही मूर्ख नाही,” तो म्हणाला, “इतकी मस्त जागा सोडून!”; म्हणून तो त्या मस्त खानावळीत गेला आणि आरामशीरपणे तो खात पीत बसला आणि त्या पक्षाला विसरून गेला आणि आपल्या देशाला सुद्धा.

काळ जात राहिला; आणि सर्वात मोठा मुलगा परत आला नाही, त्याची काही बातमी पण आली नाही तेंव्हा मधला निघाला, आणि सगळं त्याच्या बाबतीतही तसंच घडलं. त्याला कोल्हा भेटला आणि त्यानं त्याला चांगला सल्ला दिला पण जेंव्हा तो त्या दोन खानावळींपाशी आला तेंव्हा थोरला भाऊ जिथे मौज मजा चालली होती त्या खानावळीच्या खिडकीशी उभा होता आणि त्यानं मधल्याला आत बोलावलं; अन त्याला मोह आवरता आला नाही, आणि तो देखील आत शिरला अन तो सोनेरी पक्षी आणि आपला देश सगळं विसरून गेला.

पुन्हा काही काळ गेल्यावर सर्वात लहान मुलाला बाहेरच्या विशाल जगात जाऊन सोनेरी पक्षी शोधण्याची इच्छा झाली; पण बराच काळ त्याचा बाप काही ऐकेना, कारण तो मुलगा त्याचा फार लाडका होता आणि त्याला वाटलं की काहीतरी वाईट घडेल अन तो देखील पुन्हा परत येणार नाही. पण शेवटी असं ठरलं की त्यानं जावं कारण तो घरी थांबेना; अन तो त्या जंगलापाशी आला आणि कोल्ह्यानं त्याला तोच सल्ला दिला. पण त्यानं कोल्ह्याचे आभार मानले आणि आपल्या भावांसारखा त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला नाही; म्हणून कोल्हा म्हणाला, “माझ्या शेपटीवर बस अन तू खूप वेगात जाशील.” म्हणून तो शेपटीवर बसला, आणि कोल्हा पळायला लागला आणि दगडा-धोंड्यांमधून ते इतक्या वेगानं गेले की त्यांच्या केसांचा हवेत शिटी सारखा आवाज येत राहिला.

त्या खेड्यात पोहोचल्यावर त्या मुलानं कोल्ह्याचा सल्ला मानला आणि आजूबाजूला न पाहता तो त्या गचाळ खानावळीत गेला आणि तिथे रात्रभर आरामात राहिला. सकाळी तो प्रवासाला निघत असतांनाच कोल्हा पुन्हा तिथे आला आणि त्याला म्हणाला, “तुला एक किल्ला लागेपर्यंत सरळ पुढे जा, समोर सैनिकांची एक तुकडी गाढ झोपेत घोरत पडलेली असेल: त्यांच्याकडे लक्ष न देता जिथे सोनेरी पक्षी एका लाकडी पिंजऱ्यात बसलेला आहे अशी खोली येईपर्यंत सरळ पुढे पुढे जातच रहा; जवळच एक अतिशय सुंदर सोन्याचा पिंजरा असेल; पण त्या गचाळ पिंजऱ्यातून तो पक्षी काढून त्या देखण्या पिंजऱ्यात ठेवायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तू पस्तावशील.” मग कोल्ह्यानं आपली शेपटी पसरली आणि तो मुलगा त्यावर बसला आणि निघाले ते दगड-धोंड्यांमधून अशा वेगानं की त्यांच्या केसांमधून शिटी सारखा आवाज यायला लागला.

किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी  सर्व काही कोल्ह्यानं  सांगितल्याप्रमाणेच होतं: तर तो मुलगा आत गेला आणि त्याला एका खोलीत तो सोनेरी पक्षी एका लाकडी पिंजऱ्यात टांगलेला दिसला, आणि त्याखालीच सोन्याचा पिंजरा होता आणि ती तीन सोनेरी सफरचंदं देखील शेजारी पडलेली होती. “इतक्या सुंदर पक्षाला इतक्या गचाळ पिंजऱ्यातून  नेणं फारच हास्यास्पद वाटेल,” असा विचार करून त्यानं तो पिंजरा उघडला आणि त्या पक्षाला धरून त्या सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं. पण तो पक्षी इतक्या जोरात ओरडायला लागला की सर्व सैनिक जागे झाले, त्यांनी त्याला पकडलं आणि राजासमोर हजर केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा निवाडा करायला न्यायालय बसलं आणि सर्व ऐकून घेतल्यावर त्याला मृत्यूची सजा सुनावण्यात आली, पण जर त्यानं हवेपेक्षा वेगानं दौडणारा सोनेरी घोडा आणून दिला तर त्याची सुटका होणार होती, शिवाय त्याला तो सोनेरी पक्षी सुद्धा देउन टाकण्यात येणार होता.

म्हणून तो पुढच्या प्रवासाला निराश अवस्थेत उसासे टाकत निघाला तेवढ्यात अचानक त्याचा दोस्त कोल्हा त्याला भेटला आणि म्हणाला, “पाहिलंस माझा सल्ला न ऐकल्यानं काय झालं ते. तरीदेखील मी तुला तो सोनेरी घोडा कसा शोधायचा ते सांगतो, जर तू माझ्या सांगण्याप्रमाणे करणार असशील तर. तू सरळ पुढे एक किल्ला लागेपर्यंत जा, तिथे एका तबेल्यात तो सोनेरी घोडा उभा असेल: त्या शेजारीच मोतद्दार गाढ झोपेत घोरत असेल: तो घोडा हळूच तेथून घेउन ये, पण नक्की त्या घोड्याला जुनाट चामडी खोगीरच घाल, आणि शेजारीच असलेलं सोन्याचं खोगीर घालू नकोस.” मग तो मुलगा कोल्ह्याच्या शेपटीवर बसला आणि ते निघाले दगड-धोंड्यांमधून अशा वेगानं की त्यांच्या केसांमधून शिटी सारखा आवाज यायला लागला.

सर्व व्यवस्थित झालं आणि तो मोतद्दार सोनेरी खोगीरावर हात ठेवून घोरत पडला होता. पण जेंव्हा मुलानं घोड्याकडे पहिलं तेंव्हा त्याला ते चामडी खोगीर घोड्यावर घालायची लाज वाटली. “मी त्याला ते चांगलं खोगीरच देतो,” तो म्हणाला, “मला खात्री आहे की तेच त्याला योग्य आहे.” जसं त्यानं ते खोगीर उचललं तसा तो मोतद्दार जागा झाला आणि एवढ्या जोरानं ओरडला की सर्व सैनिक धावत आले आणि त्यांनी त्या मुलाला कैद केलं, आणि सकाळी त्याला न्यायालयात आणलं आणि त्याला मृत्युदंड देण्यात आला. पण जर त्यानं सुंदर राजकन्या तिथे आणली तर त्याला जिवंत सोडावं आणि तो पक्षी व घोडा देखील त्याला देण्यात यावा असं ठरलं.

अतिशय दु:खी होऊन तो आपल्या मार्गानं निघाला; पण तो कोल्हा आला आणि म्हणाला, “तू माझं का ऐकलं नाहीस? जर ऐकलं असतंस तर तुला घोडा व पक्षी दोन्ही नेता आले असते, पण तरीही मी आणखी एकदा तुला सल्ला देतो. सरळ पुढे जा आणि संध्याकाळपर्यंत तुला एक किल्ला लागेल. रात्री बारा वाजता राजकन्या स्नानगृहात जाते: तिच्याजवळ जाऊन तिला एक चुंबन दे, आणि ती तिला तुझ्याबरोबर घेऊन जाऊ देईल; पण काय वाटेल ते झालं तरी तिला तिच्या आई-बाबांचा निरोप घेऊ देऊ नकोस.” मग कोल्ह्यानं आपली शेपटी पसरली आणि तो मुलगा त्यावर बसला आणि निघाले ते दगड-धोंड्यांमधून अशा वेगानं की त्यांच्या केसांमधून शिटी सारखा आवाज यायला लागला.

ते किल्ल्यापाशी आले तर सर्व कोल्ह्यानं सांगितल्याप्रमाणेच होतं, आणि बारा वाजता तो तरुण मुलगा अंघोळीला जाणाऱ्या त्या राजकन्येला भेटला आणि त्यानं तिला चुंबन दिलं, आणि ती त्याच्याबरोबर पळून जायला तयार झाली पण डोळ्यात अगदी अश्रू आणून ती जाण्यापूर्वी आपल्या वडिलांचा निरोप घेण्याची परवानगी मागायला लागली. सुरुवातीला त्यानं नकार दिला पण ती जास्तच रडायला लागली आणि अगदी त्याच्या पायावर पडली, आणि शेवटी त्यानं परवानगी दिली, पण ते तिच्या वडिलांच्या महालाजवळ येताच पहारेकरी जागे झाले आणि तो कैदेत पडला.

मग त्याला राजासमोर आणण्यात आलं आणि राजा म्हणाला, “जर तू माझ्या खिडकीतून नजरेआड येणारी टेकडी आठ दिवसात सपाट केलीस तरच तुला राजकन्या मिळेल नाहीतर कधीच नाही.” आता ही टेकडी एवढी मोठी होती की पूर्ण जग सुद्धा ती हलवू शकलं नसतं: आणि सात दिवस कष्ट करून सुद्धा अगदी थोडं काम झालं होतं तेंव्हा कोल्हा पुन्हा आला व म्हणाला, “तू आता पड, आणि झोपून जा, मी तुझं काम करतो.” अन सकाळी तो उठला तेंव्हा टेकडी नाहीशी झाली होती; त्यामुळे तो आनंदानं राजाकडे गेला आणि त्यानं राजाला सांगितलं की आता टेकडी नाहीशी झाली असल्यानं राजानं त्याला राजकन्या द्यायलाच हवी.

मग राजाला आपला शब्द पाळावा लागला आणि तो तरुण मुलगा आणि राजकन्या जायला निघाले; अन तो कोल्हा आला आणि म्हणाला, “आपण तीनही घेऊन जाऊ, राजकन्या, घोडा आणि पक्षी.” “आहा!” मुलगा म्हणाला, “ते तर फारच उत्तम होईल पण हे तू कसं साध्य करू शकतोस?”

“तू फक्त ऐकशील,” कोल्हा म्हणाला, “तर ते शक्य होईल. तू राजाकडे जाशील तेंव्हा त्याला म्हण ‘हे पहा ही राजकन्या!’ तर तो खूष होऊन तुला सोनेरी घोडा देईल त्यावर स्वार होऊन तू निरोपासाठी सर्वांशी हात मिळव पण राजकन्येचे हात सर्वात शेवटी हाती घे. तिला उचलून आपल्यामागे घोड्यावर घे, घोड्याला टाच मार आणि तुला शक्य तेवढ्या वेगानं दौडत दूर जा.”

सर्व व्यवस्थित झालं: मग कोल्हा म्हणाला, “जेंव्हा तू पक्षी असलेल्या किल्ल्यापाशी येशील तेंव्हा मी व राजकन्या बाहेरच थांबू, तू दौडत आत जा आणि राजाशी बोल; जेंव्हा तो खरोखरीच सोनेरी घोडा पाहिल तेंव्हा तो पक्षी बाहेर आणेल; तेंव्हा तू तसाच बसून रहा आणि तो सोनेरी पक्षी खरा आहे नं ते पाहायला तो पक्षी माग; अन तुझ्या हाती तो पक्षी येताच दौडत बाहेर ये.”

हेसुद्धा कोल्ह्यानं सांगितल्याप्रमाणेच घडलं; पक्षी घेऊन ते निघाले, राजकन्या पुन्हा घोड्यावर बसली आणि ते दौडत एका प्रचंड जंगलापाशी आले. मग कोल्हा आला आणि म्हणाला, “कृपया मला ठार कर, आणि माझं डोकं आणि पाय कापून टाक.” पण त्या मुलानं असं करायला नकार दिला: तर तो कोल्हा म्हणाला, “तरीही मी तुला योग्य सल्ला देतो: दोन गोष्टींपासून सावध रहा; कुणाची सुटका करण्यासाठी दंडाचे पैसे भरू नकोस आणि कुठल्याही नदीकाठी बसू नकोस.” आणि तो निघून गेला. “ठीक आहे,” मुलगा म्हणाला, “इतका काही कठीण सल्ला नाही.”

राजकन्येबरोबर तो दौड करत त्याचे दोघे भाऊ जिथे होते त्या खेड्यापाशी आला. तिथे त्याला प्रचंड कोलाहल ऐकू आला; आणि त्यानं काय प्रकार आहे विचारल्यावर लोक म्हणाले, “दोन जणांना फाशी देणारैत.” जसा तो जवळ आला तसं त्याला दिसलं की ते दोन जण म्हणजे आता दरोडेखोर बनलेले त्याचे भाऊ आहेत; तर तो म्हणाला, “त्यांना कुठल्याच प्रकारे वाचवलं जाऊ शकत नाही का?” तर लोक म्हणाले, ‘नाही’, पण आपल्या जवळचे सर्व पैसे त्यानं दिले तरच त्या गुंडांना स्वातंत्र्य मिळणार होतं. तर तो विचार करायला थांबला सुद्धा नाही, आणि त्यानं आपले सर्व पैसे देताच त्याचे भाऊ मुक्त झाले आणि त्याच्या बरोबर घराकडे निघाले.

मग जिथे त्यांना कोल्हा अगदी आधी भेटला होतं त्या जंगलाशी ते आले, अन इतकी छान आणि सुखद हवा सुटली होती की ते भाऊ म्हणाले, “चला, आपण या नदीकाठी खाऊ पिऊ अन थोडी विश्रांती घेऊ.” त्यावर तो कोल्ह्याचा सल्ला विसरला आणि “हो” म्हणाला आणि नदीकाठी बसला आणि त्याला काहीही संशय येऊ न देता ते दोघे गुपचूप  त्याच्या मागे आले आणि त्यांनी नदीकाठावरून त्याला आत ढकलून दिलं आणि ते राजकन्या, घोडा आणि पक्षी घेऊन आपला स्वामी जो राजा त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले, “आमच्या पराक्रमानं आम्ही हे सगळं जिंकून आणलं आहे.” मग काय, मोठा उत्सवच तिथे साजरा झाला; पण तो पक्षी गाणं गाईना, घोडा चारा खाईना आणि राजकन्येचे अश्रू थांबेनात.

धाकटा मुलगा नदीच्या तळाशी पडला: सुदैवानं नदी जवळजवळ कोरडी होती, पण त्याची हाडं जवळजवळ मोडली आणि काठ इतका उंच होता की त्याला वर येता येईना. तसं पुन्हा तो कोल्हा आला आणि माझं ऐकलं नाहीस, नाहीतर तू संकटात पडला नसतास, म्हणून त्याला खूप रागावला. “तरीही,” तो म्हणाला, “मी तुला इथे सोडून जाऊ शकत नाही, तर तू माझी शेपटी पकड आणि घट्ट धरून ठेव.” मग त्यानं त्याला ओढून वर काढलं अन तो काठावर आल्यावर त्याला म्हणाला, “तुझ्या भावांनी तुझ्यासाठी पहारा बसवलाय आणि तू राज्यात दिसताच तुला ते मारून टाकतील.” म्हणून तो एका गरीब माणसाचा वेष घेऊन गुप्तपणे राजवाड्यात आला, पण तो प्रवेशद्वारातून आत येताच घोडा चारा खायला लागला, पक्षी गाणं गायला लागला आणि राजकन्येनं रडणं थांबवलं. मग तो राजाकडे गेला आणि त्यानं आपल्या भावांचं सगळं कपट राजाला सांगितलं; अन त्यांना बंदी बनवून शिक्षा देण्यात आली, अन त्याला राजकन्या पुन्हा मिळाली; आणि राज्याच्या मृत्युनंतर त्याला राज्याभिषेक करण्यात आला.

बऱ्याच काळानंतर एकदा तो जंगलात फिरायला गेला असतांना त्याला तो कोल्हा भेटला अन त्यानं अगदी डोळ्यात पाणी आणून त्याला आपल्याला ठार करून डोकं आणि पाय कापण्याची विनंती केली. आणि शेवटी त्यानं तसं केलं आणि क्षणातच त्या कोल्ह्याचं माणसात रुपांतर झालं, अन तो त्या राजकन्येचा खूप खूप वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ निघाला.

Leave a Reply